Join us

... तर केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लावावा लागेल; किशोरी पेडणेकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 1:42 PM

आताच कुठे आपण सावरतोय, कोणालाही लॉकडाऊन नकोय; किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य.

Coronavirus In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून खाली येत असलेला कोरोनाचा आलेख (Coronavirus) पुन्हा एकदा वर जाताना दिसत आहे. राज्यात आणि प्रामुख्यानं मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनेही काही निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी ऑफलाइन शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जर रुग्णसंख्येनं २० हजारांचा टप्पा ओलांडला तर पुन्हा केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन करावा लागेल असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 

"कमी लोकांमध्ये आपले समारंभ उरकून घ्यावे. तसंच समारंभ उरकताना आपण सुपर स्प्रेडर होऊ नये याचीही काळजी घ्या," असं महापौर म्हणाल्या. आयुक्त इक्बाल चहल हे स्वत: ही परिस्थिती हाताळत आहेत. ते यावर लक्ष देऊन काम करतायत. जी यंत्रणा आपण उभी केली त्याकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे. पण आज ज्या प्रकारे लोकांना लॉकडाऊन नकोय. आता आपण कुठेतरी सावरतोय. जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल. आपण प्रत्येकानं गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, मास्क वापरेन, घरातील सगळ्यांना लस देईन, ज्या ठिकाणी जाणार तिथे मार्गदर्शक सूचना पाळेन याकडेही लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या. "जर आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली तर आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाही. परंतु तेच जर २० हजारांचा आकडा पार झाला तर केंद्रानं दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल," असंही महापौर म्हणाल्या.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकाकिशोरी पेडणेकर