Join us

संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, ८ तारखेला निर्णय; विधानसभाध्यक्षांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 1:04 PM

विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली.

मुंबई-

विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची मागणी विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सभागृहात आज गदारोळ पाहायला मिळाला. राऊतांच्या विरोधात कारवाईची मागणी यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि आमदार भरत गोगावले यांनी केली. तसंच विरोधी पक्षातील अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं. 

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन विधीमंडळाचा अपमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या मागणीबाबत दोन दिवसात चौकशी करुन निर्णय देणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. त्यामुळे राऊतांविरोधातील हक्कभंगाच्या नोटीसवर ८ मार्च रोजी राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. 

राज्याच्या विधानमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान हे विधानमंडळ खपवून घेणार नाही. राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी भारतीय संविधानाचा आणि विधीमंडळाचा अपमान केला आहे. यातून महाराष्ट्राचा देखील अपमान झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होणे आवश्यक असून सदस्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करुन ८ तारखेला याबाबतचा निर्णय दिला जाईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतराहुल नार्वेकर