विकासाच्या मुद्द्यावर शेकापला रोखणार
By admin | Published: January 14, 2015 10:50 PM2015-01-14T22:50:41+5:302015-01-14T22:50:41+5:30
रायगड जिल्ह्यात शेकापने सातत्याने विकासाबाबत जनतेची फसवणूक केली आहे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शेकापने सातत्याने विकासाबाबत जनतेची फसवणूक केली आहे. सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्याच विकासाच्या मुद्द्यावर शेकापला रोखणार असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे सांगितले.
अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शहापूर मतदार संघाची पोटनिवडणूक येत्या २८ जानेवारीला पार पडणार आहे. त्याचप्रमाणे अलिबाग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांचे भाजपामध्ये औपचारिक स्वागत करण्यासाठी ते अलिबाग येथे आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार ठाकूर यांनी अलिबाग तुषार शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्या प्रसंगी आमदार ठाकूर बोलत होते.
शेकाप हा आमचा शत्रू नसून तो राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या केवळ गप्पा मारल्या आहेत. त्यामुळे येथे विकास करण्यास आम्हाला मोठ्या संख्येने संधी असल्याने शेवटच्या स्तरापर्यंत विकासाची गंगा नेणार असून विकासाच्या मुद्द्यावरच शेकापला रोखणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खारघर टोलबाबत सरकार जनतेच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्र्वास आहे. एमएच ०६ आणि एमएच४६ या वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबतचे लेखी पत्र घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार ठाकूर यांनी सांगितले.
आरएसएस आणि भाजपा हे एक समीकरण आहे. पक्षीय संघटन वाढविताना आरएसएसची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारला असता, पक्ष नेतृत्व जो आदेश, सूचना देतील त्यानुसारच काम करण्यात येईल असे आमदार ठाकूर यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश काठे, सतीश धारप, अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, सतीश लेले, शहापूर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार राजेश म्हात्रे, अॅड. महेश मोहिते यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
होते. (वार्ताहर)