उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यामुळे कुणाल कामरा वादात सापडला आहे. मुंबईपोलिसांसमोर हजर होण्यासाठी त्याने आणखी वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कामरा याला शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती समोर आली आहे. कुणाल कामराला सुमारे ५०० फोन कॉल आले आहेत. यात लोकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी मुंबईपोलिसांनी कुणाल कामरा याला नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल कामरा याला त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात खार पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आम्ही कामरा याला प्राथमिक सूचना बजावली आहे. त्याच्याविरुद्धच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."
तर दुसरीकडे कुणाल कामरा याने सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. मुंबईत ज्या ठिकाणी कॉमेडी शो रेकॉर्ड केला जात होता त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीवरही कामरा याने टीका केली.
हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड
रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केली, या ठिकाणी कुणाल कामराचा शो चित्रित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्याने 'गद्दार' हा शब्द वापरून शिंदेंवर टीका केली होती. रविवारी रात्री संबंधित क्लब असलेल्या हॉटेल युनिकॉन्टिनेंटलच्या बाहेर मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी क्लब आणि हॉटेलच्या परिसरात तोडफोड केली.