वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 20:41 IST2025-02-04T20:30:25+5:302025-02-04T20:41:32+5:30
वर्षा बंगल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."
CM Devendra Fadnavis: प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र सत्ता स्थापन होऊन जवळपास दोन महिने होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे शासकीय निवावस्थान वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरुन राज्याच्या राजकारणात विविध उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाण्यासाठी घाबरत असल्याचे म्हटलं. मात्र आता या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वर्षा बंगला याची गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा या बंगल्यावर राहायला का येत नाहीत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता. गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस म्हणून रेडे कापले आणि त्याचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरले आहे, असे तेथील स्टाफ आणि कर्मचारी सांगतात, असाही दावा संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहण्यास का गेले नाहीत? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला.
"एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी काम चालू आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी त्या बंगल्यात राहायला गेलो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ पण इतक्या वेळा सारख्या चर्चा सुरू आहेत. मला तर वाटतं माझ्या स्तरावरील माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या या चर्चा सुरू आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
"मला वाटतं की अलिकडच्या काळात काही बाबतीत वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा, पण स्पष्ट सांगतो. आज मी एका माध्यमांवर पाहिल की वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का?," असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.