गुजरातमधून रेल्वेने येणारे दुधाचे टँकर अडवणार - भाकप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:37 IST2018-07-18T13:24:36+5:302018-07-18T13:37:47+5:30
दूध आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न

गुजरातमधून रेल्वेने येणारे दुधाचे टँकर अडवणार - भाकप
मुंबई - महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन फोडण्यासाठी रेल्वेने गुजरातहून दुध आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करत असून दूधाच्या गाड्या मुंबईमध्ये अडवण्यात येतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य दरासाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याबद्दल आंदोलकांबरोबर बसून ताबडतोब तोडगा काढण्य़ात यावा. मात्र हे न करता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. त्याचाच भाग म्हणून गुजरातमधून दूध आणण्याचा प्रयत्न आहे. गुजरातमधून दूध किंवा इतर शेतीमाल आणावा याला विरोध नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शेतीमाल किंवा दूध नेण्यात काही गैर नाही. परंतू आंदोलनाच्या काळात हे करणे म्हणजे म्हणजे न्याय मागण्या चिरडून टाकण्यासाठी उचलेलं पाऊल आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल ही तत्परता दाखवत आहेत. मुंबईतील ७५ लाख रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन समस्या आहेत. पूल कोसळत असताना, प्रवाशांचे मृत्यु होत असताना, रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी गुजरातमधून रेल्वेने दूध आणत आहेत. हे कृत्य शेतकरी द्रोही,महाराष्ट्र द्रोही आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. वेळीच योग्य निर्णय घ्यावा नाहीतर परिणामाची जबाबदारी सरकारची राहील असंही पक्षाने म्हटलं आहे.