"बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:05 PM2020-08-14T12:05:52+5:302020-08-14T12:26:39+5:30

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

We will not forget the suffering inflicted by Shiv Sainiks, said MNS leader Santosh Dhuri | "बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही"

"बाळा नांदगावकरांचे आदित्य ठाकरेंबाबतचे मत वैयक्तिक; आम्ही शिवसैनिकांनी दिलेला त्रास विसरणार नाही"

Next

मुंबई:  गेल्या काही  दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा दावा करणारे अनेक तर्कवितर्क सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ठाकरे कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा यात सहभाग असेल असं मला वाटत नाही असं मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले होते. परंतु आता बाळा नांदगावकरांच्या या विधानानंतर मनसेच नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.

बाळा नांदगावकर यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मैत्री सगळ्यांशी सगळ्यांसोबत असते, अनेकांनी सीबीआयची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सीबीआयकडे केस वर्ग केली आहे. जे काही असेल ते चौकशीतून बाहेर येईल पण ठाकरे कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा यात सहभाग असेल असं मला वाटत नाही असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले होते. तसेच भाजपाच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला, असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मनसेचे नेते संतोष धुरी यांनी बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

'टीव्ही ९'ने दिलेल्या वृत्तानूसार संतोष धूरी म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याबाबतचे मत हे बाळा नांदगावकर यांचे वैयक्तिक मत असावे. आम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसेनेने दिलेला त्रास आणि दररोजचा आमचा त्यांच्याशी होणार संघर्ष विसरणार नाही, असं मत धुरी यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत नेमकी मनसेची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

या प्रकरणात आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

राज्य सरकार कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे, बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे असा आरोप त्यांनी केला होता. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

 राज ठाकरेंनी यापूर्वी सुशांत प्रकरणावर काय भूमिका घेतली होती?

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपसृष्टीत वाद उसळला होता आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा, अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर याबाबत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी अशा शब्दात स्पष्टीकरण दिलं होतं.

काय आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण?

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून रोजी आपले जीवन संपवले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांत सिंग राजपूतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटलं जातं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप केले होते. या प्रकरणात चाहत्यांनी करण जोहर आणि सलमान खान यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. कालांतराने या प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव जोडलं गेले.

रिया ही सुशांतची गर्लफ्रेंड होती. तिने सुशांतची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सुशांतच्या वडिलांनी पटणा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली. सुशांतची मेनेजर दिशा सालियाने हिनेही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लावला होता. या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले गेले. मुंबई पोलीस या आरोपातून कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप विरोधकांनी करुन याचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली. सध्या मुंबई पोलीस आणि सीबीआय यांच्यातील चौकशीचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

Web Title: We will not forget the suffering inflicted by Shiv Sainiks, said MNS leader Santosh Dhuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.