Join us  

'एकनाथ शिंदेंनी कदाचित पुढे वेगळी भूमिका घेतली तर...'; दीपक केसरकरांच्या विधानाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 8:13 PM

उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही विधानावर आम्ही कोणीच उत्तर देणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. 

मुंबई- पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 

तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आज शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी

उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. 

पत्रकारांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारले असता, उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही विधानावर आम्ही कोणीच उत्तर देणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. आता जरी आमची ही भूमिका असली, तरीही उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर आहे. ते आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही विधानावर आम्ही उत्तर देणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

सुरक्षेचा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्री 'बस'मध्ये, गोव्यातील आमदार मुंबईला निघाले

कधाचीत पुढच्या काही काळामध्ये एकनाथ शिंदेंनी नाईलाजाने वेगळी भूमिका घेतली, तर ते वेगळं ठरेल. परंतु याचा अर्थ आमच्याकडे उत्तरे नाहीत, असं नाही. परंतु भावनासुद्धा असतात. नाती जुळलेल्या असतात, असं दीपक केसरकर म्हणाले. नाती जपण्यामध्ये जी गोडी आहे, ती राजकारणातही नाही. त्यामुळे किती ताणवं, यालाही काही मर्यादा असतात, असं दीपक केसरकर म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनादीपक केसरकर