मुंबई- संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. मात्र ही अट संभाजीराजेंना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
संभाजीराजे शिवसेनेची ऑफर स्वीकारणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. संभाजीराजेंना शिवसेनेच्या अनेक गोष्टींमध्ये बंधनकारक रहावे लागले असते. शिवाय शिवसेना पुरस्कृत उमेदवार असेही झाले असते. शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. शिवसेनेनं २ जागा लढवणं अपराध नाही. दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, मग ते कुणीही असो, असं संजय राऊत म्हणाले. तसेच आम्ही संभाजीराजेंना सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि शिवसेनेकडून राज्यसभेची जागा लढवा. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावलं मागे जाऊ, तुम्ही छत्रपती आहात, असं ते म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, ही माझी मन की बात नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मन की बात आहे. तसेच संभाजीराजेंना आमचा विरोध नाही. मात्र राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणं आम्हाला गरजेचं आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजेंनी जादाची मते आपल्याला देण्याची विनंती केली होती. परंतू, सहावी जागा शिवसेनेची असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करत, शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे सूचित केले होते.