राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला?, हे आम्ही न्यायालयात पटवून देऊ- गृहमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 09:44 PM2022-05-06T21:44:46+5:302022-05-06T21:44:59+5:30
न्यायालयाने सदर प्रकरणानंतर निरीक्षण नोंदविल्यानंतर यावर आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, राणा दाम्पत्यावर पोलिसांनी विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली होती. त्यातच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सरकार विरोधात कट केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात १२४ अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्याबाबत कोर्टाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असून, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे.
पोलिसांनी अटक केल्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याला परवा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर याबाबतचं सविस्तर निकालपत्र काल समोर आलं होतं. त्यामध्ये राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम १२४ अ, हे चुकीचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते, असे न्यायालयाने म्हटले आहे. सत्र न्यायालयाचा हा निकाल राज्यातील ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाने सदर प्रकरणानंतर निरीक्षण नोंदविल्यानंतर यावर आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला, हे वरील न्यायालयात पटवून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजद्रोहाचं कलमच राहिले नाही तर त्याचा कुणी गैरवापर करणार नाही. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्रानेच गाईडलाईन ठरवणं गरजेचं असल्याचे दिलीप वळसे-पाटलांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कलमे लावण्यात आली होती. तसेच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाची कलमे लावण्यात आल्याचे सांगत त्यांच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे.
राणा पती-पत्नी खूप भावूक-
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर गुरुवारी राणा दाम्पत्याची कारागृहातून सुटका झाली होती. नवनीत राणा यांची तुरुंगात प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रवी राणा यांनीही तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात धाव घेत नवनीत राणा यांची भेट घेतली होती. तेव्हा राणा पती-पत्नी खूप भावूक झाले होते.