मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:24 AM2020-01-22T03:24:37+5:302020-01-22T03:25:42+5:30
वसतिगृहातील अपु-या सुविधांच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी अलीकडेच आंदोलन केले होते. याची दखल घेत मंत्री मुंडे यांनी आज वसतिगृहास भेट दिली.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी वरळी बीडीडी चाळीतील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहास भेट दिली. या वसतिगृहातील विविध समस्या सोडविण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
वसतिगृहातील अपु-या सुविधांच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी अलीकडेच आंदोलन केले होते. याची दखल घेत मंत्री मुंडे यांनी आज वसतिगृहास भेट दिली. या वेळी मुंडे म्हणाले, शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णयामध्येही बदल केले जातील. त्यासाठी विभागामार्फत लवकरच कार्यवाही केली जाईल. राज्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निवासाची, भोजनाची व इतर शैक्षणिक सुविधांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार कपिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.