वांद्रे वर्सोवा सीलिंकमुळे बाधीत होणाऱ्या वेसावकरांना न्याय मिळण्यासाठी सभागृहात प्रश्न मांडू; रमेश पाटील यांचे आश्वासन
By मनोहर कुंभेजकर | Published: December 7, 2023 10:58 AM2023-12-07T10:58:56+5:302023-12-07T10:59:11+5:30
मुंबईच्या विकासामध्ये नैसर्गिक साधन सामग्री समुद्र खाड्या खाजनावर अवलंबून असणारा मुंबईचा भूमिपुत्र असलेला कोळी समाज संपूर्ण बाधित झाला आहे.
मुंबई- मुंबईच्या विकासामध्ये नैसर्गिक साधन सामग्री समुद्र खाड्या खाजनावर अवलंबून असणारा मुंबईचा भूमिपुत्र असलेला कोळी समाज संपूर्ण बाधित झाला आहे. या विकासामध्ये त्यांचे मासेमारी क्षेत्र संपूर्णतः हिरावून गेले असून प्रचंड प्रदूषणामुळे त्यांच्या मासेमारी आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मुंबईच्या सत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या विकासामध्ये मुंबईतील मूळ कोळी समाजाला वाटा मिळावा म्हणून उपेक्षित असणाऱ्या पारंपारिक मासेमारांची जोरदार मागणी आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडू अशी ग्वाही कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी येथे झालेल्या पारंपरिक मासेमारांच्या सागरी परिषदेमध्ये दिली.
वांद्रे वर्सोवा सिलिंग करिता झालेला भराव आणि समुद्रात उभा राहत असलेला पूल यामुळे वेसावा गावातील पारंपारिक मच्छीमार बाधित होत असल्याने वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष राजहंस टपके यांच्या अध्यक्षतेखाली श्री मसान देवी सभा मंडपात येथील पारंपारिक मासेमारांची सागरी परिषद आयोजित केली होती.या परिषदेमध्ये आमदार रमेश पाटील यांच्या कडे जोरदार मागणी केली.
वांद्रे जुहू वर्सोवा मढ असा अरबी समुद्रातील वर्तुळाकार नैसर्गिक पट्टा या ठिकाणी वेसावे गावातील लहान लहान मच्छीमार मासेमारी करून उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या या जीवन जगण्याच्या अधिकारावरच बाधा येत असल्याने त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण राज्य शासनाच्या निदर्शनास आणून वेळ पडल्यास सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन यावेळ त्यांनी दिले. कोळी समाज एकत्र येत असून शासनाला न्याय द्यावाच लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुंबईतील गावठाण विस्ताराची समस्या हिरावून गेलेली मासेमारी क्षेत्र आणि विकासापासून दूर फेकला गेलेला कोळी समाज संपूर्ण बाधित झाला आहे.यामुळे आमचा मासेमारी व्यवसाय उदरनिर्वाह निवारा आणि संस्कृती लयास गेली आहे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या या कोळी समाजाला मुंबई विकास प्रकल्प बाधित म्हणून मान्यता देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष राजहंस टपके यांनी केली. यावेळी ठाणे गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर भूमिपुत्र फाउंडेशनचे विकास कोळी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भावे, कोळी जमात संस्कृती संवर्धनाचे मोहित रामले यांनी आपले विचार मांडले.या परिषदेचे सेक्रेटरी दक्षित टिपे खजिनदार संतोष लाये यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन केले.