लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी असलेला ड्रीम प्रोजेक्ट मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामाबाबत वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमार हे नाराज होते. कोस्टल रोज प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे इथल्या स्थानिक मच्छिमारांनी दि, ३० ऑक्टोबर रोजी कोस्टल रोडचे काम बंद पाडत आंदोलन केले होते. याबाबत मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज दुपारी वरळी कोळीवाड्याला भेट देऊन येथील कोळीबाधवांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
स्थानिक कोळी बांधवांची कोस्टल रोडच्या मनमानी कारभारावर असलेल्या नाराजीबाबत पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, "कोस्टल रोडचं काम चालू आहे. वरळीतल्या कोळी बांधवांच त्यावर काय म्हणणं आहे ते आज मी ऐकून घेतले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर बोलणार आहे, लवकरच त्यावर तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिले
कोळी बांधवांना आपण संघर्ष मागे घ्यायला सांगितलंय. महापालिकेलाही सांगितलंय, जो पर्यंत आमचा निर्णय होत नाही, तो पर्यंत पुढचे काम करू नका, बाकी काम सुरू ठेवा. कोस्टल रोड विरोधात कोळी बांधव नाहीत. त्यांच्या काही ठराविक मागण्या आहेत, त्या योग्य आहेत, त्यावर चर्चा करून तोडगा काढू असे मंत्री अस्लम शेख म्हणाले .