आम्ही त्यांना दाखवूनच देऊ; राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरेंचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:34 AM2022-08-01T09:34:32+5:302022-08-01T09:34:51+5:30

मातोश्री निवासस्थानासमोर जमलेल्या ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसमोर बोलताना ठाकरे म्हणाले की, एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली आहे.

We will show them; Uddhav Thackeray's attack on ED after Sanjay Raut's action | आम्ही त्यांना दाखवूनच देऊ; राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरेंचा हल्ला

आम्ही त्यांना दाखवूनच देऊ; राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरेंचा हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मातोश्री निवासस्थानासमोर जमलेल्या ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसमोर बोलताना ठाकरे म्हणाले की, एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश बोलले होते की, विरोधी पक्षाला दुष्मन समजू नका, पण आता विरोधी पक्ष तर लांबच आहे, पण एकेकाळी मित्रपक्ष होता त्याचासुद्धा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय. 
संजय राऊत यांच्यावरील कारवाई त्याचाच एक भाग आहे.भाजपचे कारस्थान आहे की, हिंदुत्वात फूट पाडायची, मराठी-अमराठी करायचे आणि मराठी माणसालाच चिरडून टाकायचे. 

शिवसेना एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. मोकळे कुरणच यांना मिळेल. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नाते तुटले की जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची आहे. पण हे नाते कधीही तुटणार नाही... प्रयत्न तर करून बघा, असे आव्हान त्यांनी दिले.पण हे सगळे कारस्थान लाजलज्जा शरम सोडून चाललेले आहे. 

एक दडपशाही सुरू आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतो की, आज तुम्ही घोषणा देताय, पण या सगळ्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची हिंमत तुमच्यात आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना चिमटा
फोन आला की हातातले सोडून दिल्लीला पळतात. जे पलीकडे गेले त्यांना मातोश्रीने प्रेमच दिले. त्या प्रेमाचे काटे त्यांना टोचायला लागले आणि म्हणून ते पलीकडे गेले. पलीकडे गेले ते गेले, फोन येण्याचा अवकाश, हातचे सोडून दिल्लीला पळतात. कालसुद्धा कसे पळाले ते तुम्ही पाहिलेत. मी असे पळून जाणारा मुख्यमंत्री नव्हतो, असा चिमटाही ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नाव न घेता काढला.

Web Title: We will show them; Uddhav Thackeray's attack on ED after Sanjay Raut's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.