मुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या किमान समान कार्यक्रमानुसार एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या सरकारची चाके तीन दिशांना जातील. सत्तेसाठीची लाचारी शिवसेनेला लखलाभ, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना केली. भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, नवीन सरकारला सहकार्य करू, असे ते म्हणाले.राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माझ्यासोबत शपथ घेतली होती. त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला. मी सरकारमध्ये राहू शकत नाही, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सांगितले. त्यामुळे आमच्याकडे बहुमत राहिलेले नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे, असे फडणवीस म्हणाले.शिवसेनेस मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपने दिलेला नव्हता. हे शिवसेनेला माहिती होते, पण त्यांना आमच्यासोबत यायचेच नव्हते. हिंदुत्वाचा मुद्दा सोडून सत्तेसाठी सोनिया गांधींच्या नावे शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या दोन मित्रपक्षांनी त्यांना पाठिंब्याची पत्रे ऐन वेळी न देऊन तोंडघशी पाडले होते. आता तीन पक्षांची तीन चाके वेगवेगळ्या दिशेला असल्याने अशा सरकारचे काय होणार, असा सवाल फडणवीस यांनी केला. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्या लोकांनी तर संपूर्ण तबेलाच खरेदी केला आहे. सत्तेसाठी त्यांनी सर्व तत्वे गुंडाळली आहे. सत्तेसाठी मातोश्रीबाहेर पडून त्यांना इतरांचे उंबरठे झिजावावे लागले, अशी टीका त्यांनी केली.निर्णय राज्यपातळीवरील होताअजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला होता. भाजपच्या केंद्रीय पातळीवर नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या निर्णयाने आपली प्रतिमा मलिन झाली नाही का, भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी आहे तसाच आहे, राज्याने मला स्वीकारलेले आहे. भाजपने १०० टक्के नैतिकता पाळली. आमच्यावर आरोप करणारे तीन पक्ष ११ दिवस नेता अन् किमान समान कार्यक्रम ठरवू शकले नाहीत.अजित पवारांवरून घेरलेसिंचन घोटाळ्यात तुम्ही, विनोद तावडेंनी अजित पवारांवर अनेक आरोप केले होते. त्याच पवारांना तुम्ही सोबत का घेतले, अशी प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी केली.मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना सोबत घेणे ही चूक होती का, याचा नंतर विचार करू. त्यांनी दबावाखाली राजीनामा दिला का, त्यांनी सोबत येण्यात कोणाची चाल होती, हे त्यांना विचारा.सिंचन घोटाळ्याची सर्व प्रकारची चौकशी आमच्या सरकारने केली आणि शिवाय या संबंधीची प्रकरणे न्यायालय हाताळतच आहे.पाच वर्षे आपण प्रामाणिकपणे सरकार चालविले, राज्यहिताचे अनेक निर्णय केले. प्रामाणिक व पारदर्शक सरकार दिले. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो, म्हणूनच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. - देवेंद्र फडणवीस
आम्ही विरोधी पक्षात बसू, सेनेला लाचारी लखलाभ - फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 7:09 AM