कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:16 PM2021-05-23T17:16:56+5:302021-05-23T17:17:40+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू

we will stop the third wave of covid 19 and win war against virus dr Tatyarao Lahane expressed confidence | कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

Next

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच तसेच कोरोनावर आपण निश्चितच विजय मिळवू, असा ठाम आत्मविश्वास महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक आणि कोरोना विरुद्धच्या लढाई साठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी बोरीवलीत व्यक्त केला.

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात वसंत व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्ह  माध्यमातून काल रात्री दुसरे पुष्प गुंफतांना मास्क हा आपल्या कपड्यांबरोबरचा एक अविभाज्य भाग असल्याचे आवर्जून त्यांनी नमूद केले. 

 शुक्रवार, दि,२१  पासून सुरु झालेल्या फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेचे 'कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच' या विषयावरील दुसरे पुष्प गुंफतांना डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्र शासनाने कोरोना विरोधातील युद्ध लढतांना काय काय उपाययोजना कराव्या लागल्या त्याची सविस्तर माहिती दिली. कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेंव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह्रुदयी नेतृत्वाची आणि त्यांच्या कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धत याचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाला, वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, हे
त्यांनी आवर्जून सांगितले. 

मास्क, सेनिटायझर आणि सतत हात धूणे या गोष्टी अतीशय सोप्या शब्दांत समजावून सांगतांना डॉ. तात्याराव लहाने यांनी आजही पन्नास टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे सांगून यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद केले. दोन जण चहा प्यायला गेले तर आधी एकाने मास्क काढून चहा प्यावा, जेवण एकत्र घ्या पण एकाने जेवा तोवर दुसऱ्याने तोंडावर मास्क राहू द्यावा, असे आळीपाळीने चहा -भोजनाचे सेवन करता येते. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्ट पँट काढतो कां ? नाही नां ? तसेच मास्क हाही आता आपल्या कपड्यांबरोबरचा अविभाज्य भाग झाला आहे. तोंड आणि नाक झाकून योग्य पद्धतीने मास्क वापरला आणि स्वच्छता, अंतर व्यवस्थित राखले तर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणून तिसरी लाट थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत, अशा प्रकारांमुळे वैद्यकीय यंत्रणेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असेही नाराजी व्यक्त करतांना त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला काहीही होणार नाही, काहीही झालेले नाही, अशा पद्धतीने मानसिकरित्या मजबूत राहणे गरजेचे आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा योग्य नाही, हे सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले. लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हे सांगायला डॉ. तात्याराव लहाने विसरले नाहीत.

जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले तर डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी घेतली.

Web Title: we will stop the third wave of covid 19 and win war against virus dr Tatyarao Lahane expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.