मुंबई : कोळी जात पडताळणीबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कोळी महासंघ शिष्टमंडळाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. गोऱ्हे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह संबंधित विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी यांच्याकडे याविषयाबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तसेच याबाबत लवकरच विधानभवनात बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत गोऱ्हे यांच्या दालनात बैठक झाली. आमदार आणि कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी ॲड. चेतन पाटील, लक्ष्मण शिंगोरे, महादेव व्हणकाळी, गजानन पेटे, मनीषा व्हणकाळी उपस्थित होते.
अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. जातपडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता वरिष्ठ पातळीवर एक समिती गठित करण्यात यावी. तसेच आदिवासी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनुसूचित क्षेत्रातील बांधवांप्रमाणेच अनुसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासींनाही मिळावा. आदिवासींची जातीय जनगणना करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.