Aditya Thackeray Mumbai Morcha: मुंबई मनपाच्या मुख्यालयावर ठाकरे गटानं आयोजित केलेल्या धडक मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. "खोके सरकारकडून मुंबई ताब्यात घेण्यासाठी माजी नगरसेवक फोडले जात आहेत. यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. याचे काही रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. लवकरच ते उघड करेन", असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांनी यावेळी मुंबई मनपामध्ये झालेल्या घोटाळ्यांचा पाढाच वाचला.
आदित्य यांचा एल्गार! ठाकरे गटानं ताकद दाखवली; गर्दी, घोषणा अन् मुंबईत घोंगावलं भगवं वादळ
"पहिला घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता. तो सर्वांना कळला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशांचा गैरवापर झाला आहे. तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का असं मला विचारतात. मी म्हणालो चोरांना काय निवेदन द्यायचे. तुम्ही जी चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय, ज्या दिवशी आमचे सरकार आले त्या दिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि अटक करणार. लक्षात ठेवा", असा उघड इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
मविआ सरकार येताच कारवाई करणार"मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे होणार होते. त्याचं काय झालं? रस्त्यांची कंत्राट फक्त ठरावीत ५ जणांना दिली जात आहेत. मुंबई मनपाची लूट सुरू आहे. लोकांची कामं कमी आणि खोके सरकारमधील कुणाचा फोन गेला की लगेच कामं होत आहेत. तुम्ही आज कोणतीही चूक नसताना सूडबुद्धीनं कारवाई करत आहात. पण ज्या दिवशी मविआचं सरकार येईल तेव्हा आम्ही कागदपत्रांनिशी पोलीस घेऊन घुसू आणि मुंबईच्या लुटारुंना तुरुंगात टाकू", असा रोखठोक इशारा आदित्य यांनी दिला.