आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, दीपक केसरकरांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:25 PM2022-07-07T12:25:23+5:302022-07-07T12:28:36+5:30

सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. 

We will talk directly to Uddhav Thackeray, he should keep the people around him out, said rebel MLA Deepak Kesarkar. | आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, दीपक केसरकरांचं मोठं विधान

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू; आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे, दीपक केसरकरांचं मोठं विधान

Next

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. 

संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर असलेली चांडाळचौकडी शिवसेना बुडविल्याविना राहणार नाही. राऊत जे म्हणतील, त्याप्रमाणे शिवसेना सध्या हलते आहे. काही झेलकरी त्यांची पालखी वाहत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. ती चांडाळचौकडी बाजूला केली, तरच पक्षाचे भवितव्य असल्याचा सल्ला एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला. 

जवळच्यांकडून शिवसेना संपवण्याचा डाव-

महाविकास आघाडीत गेली अडीच वर्षे गळचेपी झाली. सहनशीलतेचा अंत झाा, त्यामुळेच उठाव केला. आम्ही पक्षातच असून उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडून शिवसेना संपवण्याचा डाव आहे, असा हल्लाबोल आमदार शंभूराजे देसाई यांनी केला आहे. 

तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे- उद्धव ठाकरे

मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार, असं सांगत धनुष्यबाण आपलाच आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असं म्हणत शिवसैनिकांनी जोमानं काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणं शक्य होते, तेवढं दिलं. मात्र त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Web Title: We will talk directly to Uddhav Thackeray, he should keep the people around him out, said rebel MLA Deepak Kesarkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.