"लाडकी बहीण योजना बंद होणार"; राज ठाकरेंच्या विधानावर दरेकर म्हणाले, "लगेच २१०० देणे योग्य नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:30 IST2025-03-31T10:30:06+5:302025-03-31T10:30:24+5:30
राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या टीकेवरुन भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी भाष्य केलं.

"लाडकी बहीण योजना बंद होणार"; राज ठाकरेंच्या विधानावर दरेकर म्हणाले, "लगेच २१०० देणे योग्य नाही"
Pravin Darekar on Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशात महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांविषयी घोषणा होण्याची शक्यता होता. मात्र सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. रविवारी गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. दुसरीकडे, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सध्या महिलांना २१०० रुपये देणे योग्य नसल्याचे म्हटलं आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक काळात महायुतीने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात लाडकी बहीण योजना बंद होणार असं म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन बोलताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नसल्याचे म्हटलं. यानंतर टीव्ही ९ मराठीसोबत बोलताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महत्त्वाचे विधान केलं. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.
"राज्य सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु आज तरी राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच २१०० रुपये देणे योग्य नाही आणि संयुक्तिक देखील नाही," असं प्रवीण दरेकर म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
"जर लाडकी बहीण योजनेत २१०० केले तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर ६३ हजार कोटीचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षाचे तीन ते चार लाख कोटी होतात. हे पैसे फक्त वाटण्यासाठी. पण ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, ती ही देखील योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.