मुंबई - कोरोनाविरुद्धच्या देशव्यापी लढ्यात पोलीस कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्राने स्वत:ला वाहून घेतलं आहे. आपल्या सुट्ट्या रद्द करुन या क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. कुणाचा चिमुकला वडिलांची वाट पाहतोय. तर एखाद लहान मुल आपल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झालं आहे. मात्र, पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहुन आपलं काम करावं लागत आहे. घरी जाण्यासाठी वेळ मिळाला तरी, घरच्यांना स्वत:पासून दूरच ठेवावं लागत आहे. असाच एक भावनिक फोटो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढविण्याचं काम गृहमंत्री देशमुख यांच्याकडन होत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोलिसांच्या कामाचं कौतुक करणं असो, की एखाद्या पोलीस शिपायाला थेट फोन करणं असो, पोलिसांच्या पत्नीशी फोनवरुन संपर्क साधत, ताई काळजी करु नका महाराष्ट्र तुमच्या पतीच्या पाठिशी आहे. तुमचे पती देशसेवा करत आहेत, तुम्हीही देशसेवेत योगदान देत आहात, असं म्हणून राज्यातील पोलिस कुटुंबीयांना बळ देण्याचं कामही अनिल देशमुख यांच्याकडून होत आहे. देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, कोरोना वॉरियर्स म्हणून पती-पत्नीचा उल्लेख करत देशमुख यांनी कौतुक केलंय.
'आपल्या लहान मुलाला घरी एकटं ठेवून पोलीस नाईक देवदत्त कानडे आणि केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे #Covid19 च्या लढ्यात आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशा कर्तव्यदक्ष योद्धांच्या बळावरच तर आपल्याला कोरोनावर मात करायची आहे', असे भावनिक शब्द लिहून देशमुख यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील पोलीस कुटुंबाच्या योगदानाचा दाखला दिला आहे.