‘हम जीत के लेंगे आझादी, हम प्यार से लेंगे आझादी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 02:19 AM2019-12-27T02:19:11+5:302019-12-27T02:19:32+5:30
मालवणीवासीयांचा एल्गार : एनआरसी, सीएएविरोधात काढला भव्य मोर्चा
मुंबई : ‘हम जीत के लेंगे आझादी’, ‘हम प्यार से लेंगे आझादी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी’, ‘एनआरसी व सीएए कायदा वापस लो’ अशा घोषणा देत, मालवणीत मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनआरसी आणि सीएए बिलाविरोधात देशभर सुरू असलेले आंदोलन गुरुवारी मालवणीतही करण्यात आले, त्यात हजारोंच्या संख्येने मालवणीकर उपस्थित होते.
मालवणीत कमीत कमी दोन ते तीन हजार मुस्लीम बांधवांनी मालवणी गेट क्रमांक एक ते आठमधील रहिवाशांकडून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जागोजागी मुस्लीम तरुण, तरुणी आणि महिलांनी हातात पोस्टर्स घेऊन सदर कायदा मागे घ्या, मुंबई पोलीस जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या. दुपारी ३ वाजता सुरू झालेली रॅली सायंकाळी ६ वाजता पालिकेच्या म.वा.देसाई मैदानावर पोहोचली. या संविधान रॅलीमध्ये राजरत्न आंबेडकर, काँंग्रेस पक्षाचे आमदार अस्लम शेख आणि ख्रिश्चन, जैन, शीख आणि मुस्लीम समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित मोर्चेकरांना संबोधित केले. मालवणीतील आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या परिसरात ठेवला होता. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत स्वत: त्या ठिकाणी हजर राहून यावर देखरेख करत होते. तसेच उपायुक्त एम. दहिसर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप यादव, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदेव कालापाडदेखील हजर होते. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृृृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पुतळे तयार करून त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. दुपारपासून व्यापाऱ्यांनी दुकाने, मार्केट बंद ठेवली होती. मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे २०० तरुण स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. या मोर्चात संविधान बचाव आंदोलनासह जनहित विचार फाऊंडेशन, मालवणी हेल्पलाईन, व्हाईस आॅफ मालवणीसह इतर सामाजिक संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दर्शविला होता.