'माढा अन् उर्वरीत महाराष्ट्र जिंकू, विजयाचा पेढा मुख्यमंत्र्यांना भरवू'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:19 PM2019-03-11T20:19:42+5:302019-03-11T20:20:03+5:30
माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे.
मुंबई - राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची, झेलण्याची आणि परतून लावण्याची ताकद आणि धमक शरद पवार साहेबांमध्ये आहे. सलग 14 निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. साहेब उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही. आणि हो आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला घरपोच वर्षावर येऊन भरवू, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिले आहे.
माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा 'फुसका वारा' म्हणत टीका केली. तसेच माढ्यासह उर्वरित महाराष्ट्र जिंकू, आणि मुख्यमंत्र्यांना वर्षावर येऊन पेढा भरवू, असे धनंजय मुंडें यांनी म्हटले आहे. नाही तरी 23 मे नंतर देशातल्या निकालाने तुमचे तोंड कडू पडणार आहे. त्यावेळी तुम्हाला तोंड गोड करायला पेढा लागणारच असल्याचा टोलाही मुंडेंनी लगावला. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज आनंद व्यक्त करण्यापेक्षा माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत 'आजोबा' शरद पवार यांनी दिले. एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी?, असा प्रश्न करत, नातवासाठी आपण माघार घेणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं. स्वाभाविकच, शरद पवारांची माघार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद असलेल्या, सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही. साहेब उमेदवार नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माढाही जिंकू व उर्वरित महाराष्ट्रही. आणि हो आमच्या विजयाचा पेढाही तुम्हाला भरवू! @CMOMaharashtrapic.twitter.com/DGbgYnof1J
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 11, 2019