Join us

Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही; शेराला सव्वाशेर असतोच- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 2:19 PM

५६ वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुंबई- शिवसेनेकडील संख्याबळ पाहता त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व आमदारांशी मुंबईतील वेस्टन इन हॉटेलमध्ये संवाद साधला.

५६ वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. अनेक शतकं शिवसेना राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं, घाम गाळला त्यांचा मला अभिमान आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. हार जीत होत असते, उद्याची निवडणूक जिंकणार आहोतच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

राज्यसभेत एकही मत फुटले नाही. कोणी कलाकारी केल्या ते माहित आहे. उद्याच्या निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नाही. शिवसेनेत गद्दार कोणी राहिला नाही. शिवसेना मजबुतीनं उभी राहिली. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर असतोच असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. 

मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं. शिवसेनेचे नेते सचिन अहिर चांगले काम करत आहे. गेलया दोन वर्षात त्यांची टेस्ट घेतली. चांगलं काम करत आहे. शिवेसेनेचे दोन्ही उमेदवार चांगले आहेत. शिवसेनेत संधी नाही मिळाली तर कोणी नाराज होत नाही. शिवसैनिक मिळेल त्या संधीचं सोनं करतात. दिवसागणिक आपली यशाची कमान वाढती राहो, अशी आशा यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.   

'असा मूर्ख निर्णय कोणी घेतला नाही'

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, "आज संपूर्ण देश अग्निवीर योजनेवर बोलतोय. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणार आहेत. चार वर्षाचे कंत्राट, जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल. तुघलक होता, त्यानेही असा निर्णय कधी घेतला नव्हता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हे ज्याला कळत नाही, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही," असे राऊत म्हणाले.

'राज्य अशांत करण्याचा प्रयत्न'

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आज देशात अराजकता निर्माण झाली आहे. तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला आहे. महाराष्ट्राही खदखदत आहेत, पण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात असल्यामुळे महाराष्ट्र शांत आहेत. ही सूत्र शिवसेनेकडे जोपर्यंत असेल, तोपर्यंत राज्य शांत राहणार. काहीजण राज्याला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाविधान परिषद निवडणूकभाजपा