मुंबई - महायुतीत असलो तरी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. अनेक जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राज्यात राहत आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वारेमाप आश्वासन देणे ही राष्ट्रवादीची कालही भूमिका नव्हती आणि आज नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी शनिवारी मुंबईत स्पष्ट केली, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर हल्लाबोल चढविताना सरकारे येतात जातात, मात्र जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीची अन्य नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांनी आयुष्यात एका जातीचे कधीच काम केले नाही, तर सर्व धर्मांचे ते लोकप्रतिनिधी आहेत. सुनील दत्त यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नाही. लोकांमध्ये समरस व्हावे लागते, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. त्याच पध्दतीने बाबा सिद्दिकी काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
झिशान सिद्दिकी काँग्रेसमध्येचबाबा सिद्दिकी यांनी शनिवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांच्या नजरा त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या निर्णयाकडे लागून राहिले होते. तत्पूर्वी शनिवारी संध्याकाळी झिशान सिद्दिकी यांनी पक्षनेतृत्वावरील खंत पुन्हा एकदा बोलून दाखविली. वरिष्ठ नेते तरुण आमदाराला पाठबळ देत नसतील तर दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरीही मी काँग्रेसमध्येच असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.