महाराष्ट्रात ठिकठिकाणी दडवून ठेवलाय शस्त्रसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:48 AM2018-08-29T07:48:20+5:302018-08-29T07:49:57+5:30
एटीएसची माहिती : गुन्ह्याचा ठोस हेतू अजूनही अस्पष्टच
मुंबई : एटीएसने अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेला शस्त्रसाठा कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून आला आहे. तो महाराष्ट्रात विविध ठिकाणी दडवून ठेवला आहे, अशी माहिती एटीएसने न्यायालयाला दिली.
गेल्या वर्षी पुण्यातील बावधनमध्ये २८ डिसेंबर ते १ जानेवारी असा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होणार होता. त्याच्या विरोधात हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते.
कळसकरने येथे बॉम्बस्फोट घडविण्याचा कट आखला होता. त्याची रेकीही केली होती. कटात राऊत, गोंधळेकर आणि पांगरकरही सहभागी होते. मात्र फेस्टिव्हल रद्द झाल्यामुळे हा प्रयत्न फसल्याचे एटीएसने सांगितले.
प्रशिक्षण घेतल्यानंतर आरोपींनी बॉम्ब तयार करून ‘सनबर्न फेस्टिव्हल’साठी कटाची रूपरेषा आखण्यास सुरुवात केली होती. एटीएसने आरोपींकडून सर्व दस्तऐवज गोळा केला आहे. त्याची माहिती ते आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही तपासू शकतात. आतापर्यंतच्या तपासात त्यांना सूत्रधार, गुन्ह्याचा ठोस हेतू सापडला नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला. त्यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली.
कळसकरकडून जप्त केलेल्या डायरीतून विचारवंत तसेच महत्त्वाच्या व्यक्ती आणि ठिकाणांची ‘टार्गेट लिस्ट’ एटीएसला मिळाली. घातपातासाठी महाराष्ट्राबाहेर कोणी व कसा पैसा पुरवला, याचा शोध घेणे बाकी असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. जप्त केलेली शस्त्रे, साहित्य तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत.
कुटुंबाने घेतली भेट
सुनावणीवेळी राऊतच्या लहान मुलीसह आरोपींचे नातेवाईक न्यायालयात आले होते. त्यांना सुनावणीवेळी हजर राहण्याची तसेच भेटण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पुनाळेकर यांनी केली. एटीएस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी भेट घेतली. १० हजार तपशील जप्त पांगरकर याच्याकडून जप्त केलेल्या सीपीयू, पेनड्राइव्हमधून जवळपास १० हजारांहून अधिक तपशील मिळाले आहेत. त्यात विविध फोटोंचाही समावेश आहे. त्याचा कॅमेराही जप्त केला आहे.
कळसकरच्या ताब्यासाठी सीबीआयची धडपड
शरद कळसकरने सचिन अंदुरेसोबत डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी त्याचा ताबा घेण्यासाठी सीबीआयचे पथक सत्र न्यायालयात सकाळपासून तळ ठोकून होते. कळसकरचा ताबा घेण्यावरून सीबीआय आणि एटीएसच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवादही झाला. अखेर कळसकरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयच्या अर्जावरील सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे.