मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या बालाघाटवरून ८ गावठी पिस्तूलसह ८ मॅग्झीन व १४ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमास अटक करून सर्व साठा जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शनिवारी पत्रकारांना याची माहिती दिली.
मीरारोडच्या पूनम सागर मार्गावर मध्यप्रदेश वरून एक इसम शस्त्रे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांना मिळाली. व्हनकोटी सह सहायक पोलीस निरीक्षक प्रणय काटे, उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण तसेच पाटील, पठाण, संधू, मुलानी, खामगळ, केंद्रे यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी मिळालेल्या माहिती वर्णनाच्या तेथे आलेल्या इसमास ताब्यात घेतले असता त्याचे नाव नरेश मोहन देशमुख (३८) असून तो मध्यप्रदेशच्या बालाघाट, कटंगी येथील हनुमान मंदिर तलाव जवळ राहणार असल्याचे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ मॅग्झीन व ८ जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा सापडला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशी नंतर मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यातील जुलवानीया, अबी रोड, डंबनदी थान येथे जाऊन पोल्स पथकाने आणखी ३ देशी बनावटीचे पिस्तूल, ३ मॅग्झीन व ६ जिवंत काडसुते अशी आणखी शस्त्रे हस्तगत केली आहेत. एकूणच पोलिसांनी नरेश देशमुख कडून ८ गावठी पिस्तूल, ८ मॅग्झीन व १४ जिवंत काडतुसे असा शस्त्र साठा हस्तगत केला आहे. नरेश हा सदर शस्त्र कोणाला विकण्यासाठी आला होता याचा तपास पोलीस निरीक्षक जिलानी सय्यद करीत आहेत.