Video - हेल्मेट घाला, सुरक्षित राहा... रस्ते अपघातातून सुरक्षेसाठी सोनू सूदने बाईकस्वारांना वाटले हेल्मेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:42 PM2023-10-05T16:42:34+5:302023-10-05T16:51:34+5:30
महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात सोनूच्या मदतीने हेल्मेट वाटप करण्यात आले.
मुंबई - चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारा, पण वास्तवात नायकासारखी कामगिरी करणाऱ्या अभिनेता सोनू सूदने मोफत हेल्मेट वाटप करून बाईकस्वारांमध्ये जनजागृतीचे काम केले. महाराष्ट्र हायवे ट्राफिक पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यात सहभागी होत सोनूने 'रस्त्यावर कांड न करता कर्म करा', असा संदेश दुचाकीस्वारांना दिला.
महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात सोनूच्या मदतीने हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी सोनूसोबत महाराष्ट्र हायवे ट्राफिक एडीजी रवींद्र शिंकला उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या तरुणांना दंड न करता महात्मा गांधी स्टाईलने मोफत हेल्मेट वाटप करून जनजागृती करण्यात आली.
हेल्मेट घाला, सुरक्षित राहा... रस्ते अपघातातून सुरक्षेसाठी सोनू सूदने बाईकस्वारांना वाटले हेल्मेट pic.twitter.com/DJ7SCGSp14
— Lokmat (@lokmat) October 5, 2023
कठोर दंड करूनही अद्याप मुंबईत काही बाईकस्वार बिनधास्तपणे विना हेल्मेट बाईक चालवताना दिसतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये त्यांना जीव गमवावा लागतो. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी बाईकस्वारांमध्ये जनजागृती करण्याच्या कामी सोनूने वाहतूक पोलिसांना सहकार्य केले. आजवर चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारा सोनू निर्माता बनला असून, त्याच्या चाहत्यांना सोनूची पहिली निर्मिती असलेल्या 'फतेह'ची प्रतीक्षा आहे.