तज्ज्ञांसह प्रशासनाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग हेच पर्याय असल्याने प्रशासनदेखील याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे का यासाठी प्रयत्नशील आहे. दुहेरी मास्क घाला; कोरोना टाळा, असे आवाहन तज्ज्ञांसह प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.
सुरुवातीच्या काळात नागरिक विनामास्क फिरत असल्याने शासनाच्या वतीने वारंवार मास्क घालण्याचे आव्हान करण्यात येत होते. मात्र, आता डबल मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सर्जिकल मास्कवर कापडी मास्क घातल्यास आपण आजपासून स्वतःचा बचाव करू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत स्वतःची जबाबदारी स्वतःच घेण्याचे आवाहन जनतेला केले होते. आरोग्यमंत्र्यांनीदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आई-बाबा बाहेर जाताना मास्क वापरातात का? सॅनिटायझर वापरतात का? बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुतात का? असे पत्र आरोग्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पाठविले होते. याचप्रमाणे आता डबल मास्क वापरण्यासाठीदेखील नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चाैकट
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - ६,५८,६२१
बरे झालेले रुग्ण - ५,८३,५८९
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ५९,९७०
* मास्क कसा वापरावा?
नागरिकांनी घराबाहेर पडताना घरातील कापडी मास्क व त्यावर मेडिकलमध्ये उपलब्ध असणारा युज अँड थ्रो मास्क वापरल्यास अधिक फायदेशीर ठरते. बाहेरून घरी परतल्यावर युज अँड थ्रो मास्क कचरापेटीत टाकता येतो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी एन-९५ मास्कसोबत सर्जिकल मास्क घातल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते., असे डॉ केशव सुतार यांनी सांगितले.
* हे करा
कापडी मास्क वापरत असल्यास तो नेहमी स्वच्छ धुतलेला असावा.
शक्यतो उकळत्या पाण्यात काही मिनिटे कापडी मास्क ठेवावा.
सर्जिकल मास्क एका वापरानंतर पुन्हा वापरू नये.
मास्क हा पाकीटबंद स्वरूपात असल्यासच विकत घ्यावा
* हे करू नका
मास्क वापरून झाल्यास तो घरात कुठेही ठेवू नका.
फिल्टर असलेला मास्क वापरणे शक्यतो टाळा.
उघड्यावर विक्रीस ठेवलेला मास्क विकत घेऊ नका, त्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
..........................