मुंबई : दीक्षान्त समारंभात हातमागाच्या कपड्यांचा वापर करा आणि त्याचे फोटो, व्हिडीओ ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टलवर अपलोड करा, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने नियम धुडकावणाऱ्या विद्यापीठांना बजावले आहे.
१५ जुलै २०१५ ला यूजीसीने विद्यापीठांना या संबंधात सूचना केल्या होत्या. दिल्ली, जवाहरलाल नेहरू विद्यापीठांसारखी अनेक विद्यापीठे याचे पालन करत आहेत. मुंबई विद्यापीठातही दीक्षान्त कार्यक्रमात याचे पालन केले जाते. परंतु, अनेक विद्यापीठे ही सूचना धाब्यावर बसवत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आल्याने आयोगाने पुन्हा एकदा या संबंधात विद्यापीठांना सुनावले आहे.
हातमागाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने यूजीसीने हे आवाहन केले होते. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अनेकदा दीक्षान्त समारंभात पाश्चात्त्य पद्धतीचा पोषाख केला जातो. हा पोषाख आपल्याकडच्या हवामानाला अनुकूल नाही. ज्या प्रकारचे हवामान आपल्याकडे असते, त्याचा विचार करता सुती किंवा तत्मस कपड्यांचा वापर योग्य ठरतो, असे यूजीसीचे म्हणणे आहे.
उच्च शिक्षणाचे नियमन करणाऱ्या यूजीसीने विद्यापीठांना ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टलवर दीक्षान्त समारंभाची छायाचित्रे व व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितले आहे.
मुंबईत अंगरखा आणि नाना शंकरशेट पगडीमुंबई विद्यापीठात पैठणी किनार असलेला शिवकालीन अंगरखा, मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट पगडी, असा दीक्षान्त समारंभाचा पोशाख असतो. नव्या पोषाखासाठी खादीचा वापर केला जातो. दिल्ली विद्यापीठात गाऊन आणि कॅप्सच्या जागी पांढरा कुर्ता, पायजमा वापरला जातो.