मुंबई : मुंबापुरीला मंगळवारी पावसाने झोडपले, या पावसात अनेक मुंबईकरांना बराच काळ भिजावे लागले. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यातून चालावे लागले. मात्र पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आणि बराच काळ चालल्यामुळे आजारांचा धोकाही बळावू शकतो. त्यामुळे पावसाता भिजताना, चालताना सामान्यांनी खबरदारी बाळगली पाहिजे. याशिवाय, अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सामान्यांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.पावसाळ्यात साचणा-या पाण्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होते, तसेच यापासून साथीचे आजारही वाढू शकतात. विशेषत: पावसाळ्यात लहान मुलांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पालकवर्गावर असते. अतिसार, जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो यांचा प्रादुर्भाव नेहमीच असतो. तसेच कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, टायफॉईड, मलेरिया, कॉलरा, चिकूनगुनिया हे आजार उद्भवू शकतात.दूषित पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि त्वचेचं इन्फेक्शन होऊ शकतं. २००५ साली अशी वेळ आली होती. दूषित पाण्यामुळे रुग्णांना त्वचेचा संसर्ग झाला होता. ते रुग्ण माझ्याकडे अजूनही येतात. हे संसर्ग रुग्णांना पुन्हा होतात. विशेषत: अशा रुग्णांना ज्यांच्या त्वचेवर भेगा आहेत, असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वीणा भोगले यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे लेप्टोसारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. ज्या व्यक्तींच्या पायाला जखम झालेली असते त्यांना या रोगाची लागण होऊ शकते.या गोष्टी लक्षात ठेवा!स्वच्छ आणि शक्यतो लवकर वाळणारे कपडे घाला. आपण वापरत असलेले पावसाळी जर्किन किंवा रेनकोट आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवा.पावसात भिजला असाल तर डोके, मान, पायांचे तळवे, हातांचे तळवे कोरडे करा. शक्य असेल तर शेकावेत. म्हणजे ओलसरपणा निघून जातो.अंघोळीनंतर शरीर कोरडे झाल्यावर मान, गळा, पाठ या भागावर पावडर लावा.घरातील बांबू प्लांट व मनीप्लांट शक्यतो काढून टाकावेत, अथवा त्यातील पाणी दररोज बदलावे.घराच्या छतावरीलजुने टायर, थर्माकोल, जुने हेम्लेट, शूज इ. काढून टाकावेत.घराच्या आजूबाजूला पडलेली नारळाची करवंटी, प्लॅस्टिकचे कप-डबे काढून टाकावेत व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.फ्रीजचा डीफ्रॉस्ट ट्रे व एअर कंडिशन ट्रे वेळोवेळी स्वच्छ करा. ड्रम्स, पिंप व इतर भांडी कपड्याने झाकून ठेवावीत.घरांच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या लावून घ्याव्यात. मच्छरदाणीचावापर करावा.डास चावू नयेत यासाठी अंग झाकले जाईल, असे कपडे वापरा.कोणताही ताप, हिवताप, डेंग्यू असू शकतो, म्हणून ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचार करावेत.
पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 3:21 AM