लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईमधील एस बँड रडारची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे हे रडार पूर्णरीत्या कार्यान्वित नसल्याने कमी काळात लवकर मिळणारे अंदाज मिळण्यास गुरुवारी अडथळे येत होते.
मुळात पंधराएक मिनिटाने हवामानाचे अंदाज मिळणे अपेक्षित असते. मात्र जोरदार पाऊस कोसळत असतानाच एका तासाने हवामानाचे अंदाज प्राप्त होत होते. एस बँड रडार हे उत्तम मानले होते. मात्र नेमका मोठा पाऊस कोसळत असतानाच रडार पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने हवामानाचे अंदाज मिळण्यास विलंब होत होता. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडे विचारणा करण्यात आली. मात्र हवामान खात्याकडून काहीच उत्तर प्राप्त झाले नाही.
एका महिन्यात रडार पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नव्याने बसविण्यात येणारे सी बँड रडार सुरू होण्यास एक महिना लागणार आहे.