हवामान खातेही टेक्नोसॅव्ही; ऑगस्टमध्ये नवे संकेतस्थळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:30 AM2019-07-21T03:30:46+5:302019-07-21T06:15:40+5:30
केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाची माहिती । जागृतीसाठी सोशल मीडियावरही कॅम्पेन
सचिन लुंगसे
मुंबई : हवामान, वातावरण, भूकंप आणि चक्रीवादळाची माहिती देण्यासह अतिवृष्टीदरम्यान नागरिकांना सतर्क करण्याचे काम करणारे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे नवे संकेतस्थळ ऑगस्ट महिन्यात सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयानेच हीच माहिती दिली असून, महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत हवामान खात्याने स्वत:ला अद्ययावत करत वेळच्या वेळी माहिती देण्यावर भर
दिला आहे.
मुंबईमध्ये २६ जुलै रोजी आलेला महापूर असो, चेन्नईमध्ये आलेला महापूर असो वा ईशान्य भारताला सातत्याने पावसाचा बसणारा फटका
असो; अशा वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी केंद्रीय हवामान खात्यासह प्रादेशिक हवामान खात्याच्या कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर उल्लेखनीय बदल केले जात आहेत. ऑगस्ट, २०१९ मध्ये भारतीय हवामान शास्त्र विभागाचे नवे संकेतस्थळ नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. ते
हाताळण्यास अधिक सोपे असेल. संकेतस्थळावरील विविध माध्यमातून आवश्यक माहिती प्रत्येक गरजू घटकास दिली जाईल. विशेषत: येत्या दोन ते तीन महिन्यांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर हवामानाविषयी नागरिकांना जागृत करण्यासाठी मोहीम राबविली जाईल.
विभागीय स्तरावर हवामानाची माहिती हवामान खाते प्रथमत: राज्यस्तरावर हवामानाची इत्यंभूत माहिती देत होते. त्यानंतर, जिल्हास्तरीय हवामानाची इत्यंभूत माहिती देण्यावर भर देण्यात आला आणि आता विभागीय स्तरावर (ब्लॉक लेव्हल) हवामानाची माहिती दिली जात आहे.