हवामानानुसार आहारातही करा बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:53 AM2018-10-16T00:53:41+5:302018-10-16T00:53:59+5:30

तापमानवाढीचा शरीरावरही परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी, त्वचारोग, सर्दी, कफ या आजारांची लागण होत आहे.

as per Weather changes in change diet as well! | हवामानानुसार आहारातही करा बदल!

हवामानानुसार आहारातही करा बदल!

Next

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस तापमान उच्चांक गाठत आहे. मुंबई तर ३७ अंशावर पोहोचली आहे. या तापमानवाढीचा शरीरावरही परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी, त्वचारोग, सर्दी, कफ या आजारांची लागण होत आहे. मात्र, बदलत्या हवामानानुसार आहारातही बदल केल्यास या आजारांपासून दूर राहता येते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.


आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी यांनी सांगितले की, शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी उष्णतेमध्ये आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे शरीरात कायम थंडावा राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याबरोबरच पातळ पदार्थ पिणे गरजेचे आहे. जसे की, कोकम सरबत, ताक यांसारख्या पदार्थांनी शरीरातील थकवा दूर होतो. पावसाळा संपल्यानंतर साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. साथीचे आजार जडू नयेत किंवा पसरू नयेत, यासाठी आहारात ‘सी’ जीवनसत्त्वाचे पदार्थ असले पाहिजेत. उष्णतेमुळे शरीरातील क्षार कमी होत असतात. त्यामुळे मिठाचे प्रमाण अधिक असेल, अशा पदार्थांचे सेवन करू नये. खारट वेफर्स जास्त प्रमाणात खाऊ नयेत. तसेच तेलकट पदार्थ उष्णतेच्या दिवसात खाऊच नयेत, असाही सल्ला त्यांनी दिला.
आहारतज्ज्ञ ध्वनी शाह यांनी सांगितले की, सध्याच्या वातावरणात आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात भाजीपाला, कोशिंबिरीचे प्रमाण जास्त असायला पाहिजे.
दररोज २ ते ३ लीटर द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे. चरबीयुक्त, चविष्ट पदार्थ, मिठाईचे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे.
शरीरातील तापमान संतुलित राहण्यासाठी प्रत्येक तासाला पाणी, जलजिरा, ताक यांपैकी काहीतरी पिणे गरजेचे आहे.

...अशी घ्या काळजी
मुंबईच्या गर्दीतून प्रवास करून घरी किंवा कार्यालयात गेल्यावर लगेच एसीची थंड हवा घेऊ नये. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो.
रोज घराबाहेर पडणारी व्यक्ती उष्णतेमुळे होरपळून जाते. त्यामुळे जास्तीतजास्त पाणी प्यावे.
काकडी, गाजर, संत्री, लिंबू पाणी, कलिंगडाचे काप यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

सब्जा : यात लोह, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ‘ई’ जीवनसत्त्वे असतात. शरीराला थंडावा देण्यासाठी ते उपयुक्त आहे.
नारळपाणी : नारळपाण्यात पोटॅशियम मिनरल असल्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते उपयुक्त असते. उन्हात फिरताना नारळपाण्याचे सेवन केले पाहिजे.
संत्री : संत्र्यामध्ये ‘सी’ आणि ‘ए’ जीवनसत्त्व असते. संत्र्याचे सरबत आरोग्यासाठी लाभदायक असते.
टोमॅटो : तापमानापासून बचाव करण्यासाठी टोमॅटो हे ‘सन ग्लासेस’चे काम करते. टोमॅटो त्वचारोग आणि कर्करोगापासून संरक्षण करते.

Web Title: as per Weather changes in change diet as well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.