हवामान खाते, शिक्षण विभागाचे सूत जुळेना, पावस पडतो त्या दिवशी शाळेला सुट्टी नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:48 AM2019-09-06T06:48:49+5:302019-09-06T06:49:59+5:30
समन्वयाचा अभाव : शाळांना सुट्टी... पावसाची दांडी
मुंबई : मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत तीन ते चारवेळा मोठा पाऊस कोसळला. यापैकी ५ आॅगस्ट आणि ५ सप्टेंबर या दोनवेळा अतिवृष्टीचा इशारा नसतानाही शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर केली. तर ४ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने सकाळी ‘रेड अलर्ट’ दिलेला असताना दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली. यातून अतिवृष्टीच्या सुट्ट्या जाहीर करताना हवामान खाते, शिक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.
४ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला ‘रेड अलर्ट’ दिला होता. सकाळी मुंबई महापालिकेनेही टिष्ट्वटर अकाउंटवरून मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भातील दोन्ही संदेश ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान देण्यात आले होते. याचवेळी शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रातील शाळांबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात निर्णय दुपारच्या सत्रातील शाळा भरताना घेण्यात आला. प्रत्येकवेळी जोरदार पाऊस कोसळत असताना सुट्टी जाहीर करण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाच्या निर्णयाची वाट पाहते, तर शिक्षण विभाग हवामान खात्याच्या अंदाजाची प्रतीक्षा करीत असतो, अशी चर्चा सोशल मीडियामध्ये होत आहे.
कहर म्हणजे ४ सप्टेंबर रोजी रात्री शिक्षण विभागाने ५ सप्टेंबर रोजीही शाळांना सुट्टी जाहीर केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ५ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला नव्हता. केवळ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र हवामान खात्याचा अंदाज चुकला.
५ आॅगस्ट रोजी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा
दिला नसतानाही राज्य सरकारने शाळांना ‘अतिवृष्टी’च्या नावाखाली सुट्टी जाहीर केली होती. यासंदर्भातील निर्णय ४ आॅगस्टच्या सायंकाळी घेण्यात आला. प्रत्यक्षात ५ आॅगस्टचा दिवस ‘कोरडा’
गेला.
सुट्टी दिली
५ सप्टेंबर ८.९ मिलीमीटर
५ आॅगस्ट २.० मिलीमीटर
सुट्टी नाही (प्रत्यक्ष पाऊस)
२४ जुलै १७६ मि.मि.
४ सप्टेंबर २१४.४ मि.मि.
मुळात शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार हा शाळा मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला हवा. मात्र प्रसिद्धीसाठी शिक्षण विभागाने हा हक्क राखून ठेवला आहे, अशी शंका येते.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतरही शाळा, महाविद्यालये सुरू राहिली आणि एखादा आपत्कालीन प्रसंग ओढवलाच तर जबाबदारी कोण घेणार?
- उदय नरे, हंसराज मोरारजी पब्लिक हायस्कूल, अंधेरी