मुंबई आणि परिसरात आज, उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:48 AM2020-12-14T03:48:43+5:302020-12-14T07:02:27+5:30
१४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारीही ढगाळ नोंदविण्यात आले. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले गेले.
आज मध्य महाराष्ट्र, काेकणात पावसाची हजेरी
१४ डिसेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १५ ते १७ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहेआहे.
हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांशी तुलना करता, यंदा कमाल तापमानात मोठी घट नोंदविण्यात येत आहे. शनिवारी कमाल तापमान २८ अंशाच्या घरात होते. चालू हंगामात रविवारी सर्वात कमी म्हणजे २७.४ अंश एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. या हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी कमाल तापमान असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.