मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 04:10 AM2019-10-08T04:10:58+5:302019-10-08T04:15:02+5:30

हवामानात मोठी स्थित्यंतरे होणार असून, बदलत्या हवामानाचा मुंबईकरांना फटका बसणार आहे.

 Weather favorable for monsoon return trips | मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल

मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांना आॅक्टोबरचे हीटचे चटके बसू लागले असतानाच राज्यालाही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. परिणामी हवामानात मोठी स्थित्यंतरे होणार असून, बदलत्या हवामानाचा मुंबईकरांना फटका बसणार आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, कडाक्याचे उन, आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारे चढउतार यामुळे मुंबईकर ‘आॅक्टोबर हीट’मुळे घामाघूम झाले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मुंबईचा विचार करता काही दिवसांपासून मुंबईत हवामान जवळजवळ कोरडेच राहिले आहे. मात्र, शहराच्या काही भागात गेल्या २४ तासांत एक दोन ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. चक्रवाती परिस्थितीमुळे ८ ते १० आॅक्टोबरदरम्यान वाढलेल्या तीव्रतेसह, आणखी चार ते पाच दिवस म्हणजे १० आॅक्टोबरपर्यंत शहरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

राज्यासाठी अंदाज
८ आॅक्टोबर : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
९ ते १० आॅक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
११ आॅक्टोबर : कोकण, गोव्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

वादळी पावसाची शक्यता
१२ आॅक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखेपर्यंत राहील.

Web Title:  Weather favorable for monsoon return trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस