Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:59 PM2024-05-14T14:59:19+5:302024-05-14T15:01:18+5:30
Mumbai Weather Forecast ( Marathi News ) : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी ...
Mumbai Weather Forecast ( Marathi News ) : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच फजिती झाली. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक दुर्घटनाही घडल्या. अशातच आज पुन्हा एकदा मुंबई शहरातील तुरळक ठिकाणी संततधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहरातील काही भागांमध्ये सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास वाऱ्यासह संततधार पाऊस कोसळू शकतो. शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. हवामान खात्याने आज ठाणे, पालघर, रायगड, सोलापूर, लातूर, बीड, नागपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून वादळी वारे आणि संततधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पावसादरम्यान तीव्र स्वरुपाचे वारेही वाहत असल्याने इमारती, झाडे कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे पावसादरम्यान आडोसा घेताना नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे.