मुंबईची हवा बिघडली, गुणवत्तेतील सुधारणेत पुन्हा घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:25 AM2021-11-17T06:25:10+5:302021-11-17T06:25:39+5:30

कोविड काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले होते.

The weather in Mumbai is bad | मुंबईची हवा बिघडली, गुणवत्तेतील सुधारणेत पुन्हा घट

मुंबईची हवा बिघडली, गुणवत्तेतील सुधारणेत पुन्हा घट

googlenewsNext

मुंबई : दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील हवाही बिघडली आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईत कुलाबा आणि माझगावमध्ये हवेने धोक्याची पातळी ओलांडल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात सफर या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आणि नोंद करणाऱ्या प्रणालीने अहवाल दिला आहे. कुलाबा परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३५३ तर संपूर्ण मुंबईत २८० इतका नोंदविला आहे. 

कोविड काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले होते. मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईत वाहनांची वर्दळ व अन्य व्यवहारदेखील सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील हवा बिघडली आहे. त्यात दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजीने भर घातली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या वाढत्या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
सोमवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक २४५ इतका नोंदवण्यात आला. मंगळवारी यामध्ये आणखी वाढ होऊन २६९ निर्देशांक नोंदविण्यात आला आहे. ही हवा घातक असल्याने मुंबईकरांनी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून कुलाबा, माझगाव, वांद्रे - कुर्ला संकुल, मालाड आणि अंधेरी परिसरातील हवेची स्थिती खालावली आहे. तसेच हिवाळ्यात प्रामुख्याने वाऱ्यांची दिशा जमिनीकडून समुद्राकडे असल्याने हे प्रदूषण वाढल्याचे सांगण्यात येते. सोमवारी कुलाबामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३४५ होता. तर मंगळवारी त्यात वाढ होऊन ३५३ एवढी नोंद झाली आहे.

Web Title: The weather in Mumbai is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.