मुंबईत हवामान राहणार कोरडे; मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:32 AM2019-03-09T06:32:18+5:302019-03-09T06:32:25+5:30
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार, ९ मार्च रोजी राज्यात हवामान कोरडे राहील.
मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार, ९ मार्च रोजी राज्यात हवामान कोरडे राहील. पण १० आणि ११ मार्च रोजी मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. शिवाय १२ मार्चलाही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २० अंशाच्या आसपास राहील.
गेले काही दिवस वातावरणात किंचित बदल जाणवत आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात तसेच विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. शनिवारी मुंबईतील हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
>सोलापूर ३६ अंश सेल्सिअसवर
मुंबईत शुक्रवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस तर किमान तापमान १८.७ अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान सोलापूर येथे ३६.५ तर सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे १२ अंश नोंदविण्यात आले आहे. पुणे, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान ३२ अंशावर नोंदविण्यात आले आहे.