Join us

संकेतस्थळावरून सुरू होता माओवादी विचारांचा प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 5:54 AM

नक्षली भागांसह शहरी भागात माओवाद्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतल्याची माहिती एटीएसच्या निदर्शनास येताच, त्यांनी यावर बंदी आणण्यासाठी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने माओवाद्यांच्या संकेतस्थळावर बंदी आणली आहे.

मुंबई : नक्षली भागांसह शहरी भागात माओवाद्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतल्याची माहिती एटीएसच्या निदर्शनास येताच, त्यांनी यावर बंदी आणण्यासाठी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने माओवाद्यांच्या संकेतस्थळावर बंदी आणली आहे.एटीएसकडून मिळालेल्या माहितीत, हे संकेतस्थळ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेशी जोडले गेलेले आहे. या संकेतस्थळावर नक्षलवादी आणि माओवादी विचारांचा प्रसार सुरू असल्याचे समोर आले. शिवाय तरुणांची माथी भडकविण्यासाठी सरकारविरोधी मोहीम छेडलेली दिसून आली. तसेच नक्षलवादी भागातील समस्यांना चुकीच्या पद्धतीने मांडणे, तसेच एन्काउंटर झालेल्या नक्षलवाद्यांबाबत गैरसमज निर्माण करणारा मजकूर ते या संकेतस्थळावर अपलोड करत होते. तसेच सरकारविरोधातील बातम्याही यात अपलोड करण्यात येत होत्या. शहरी भागात नक्षलवादी विचार पसरविण्यासाठी हे संकेतस्थळ व्यासपीठ ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. त्यानुसार, त्यांनी या संकेतस्थळावर बंदी आणण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली. त्यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, केंद्राने संकेतस्थळावर बंदी घातली.‘राजकीय पक्षाशी संबंध नाही’संकेतस्थळ कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नसल्याचा दावा संकेतस्थळाने केला. यामध्ये फक्त सरकारविरोधी असलेले विचार मांडण्यात येत असल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. हे विचार यापुढेही अन्य माध्यमाद्वारे मांडत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :एटीएस