लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने पुन्हा कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार एकाचवेळी ५०पेक्षा अधिक लोक असलेले लग्न समारंभ, हॉटेल, पब आदींवर कारवाई केली जात आहे. चेंबूर, छेडानगर येथे एका लग्न सोहळ्यात तब्बल साडेतीनशे पाहणे असल्याचे आढळून आले. तर अंधेरी येथील पबमध्ये मध्यरात्री दीड वाजता ५० टक्क्यांहून जास्त लोक होते. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापक व वधू-वराच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने महापालिकेने मुंबईत कठोर नियमावली तयार केली आहे. त्यानुसारच पालिकेच्या चेंबूर (प.) येथील विभाग कार्यालयाने छेडानगर जिमखाना या ठिकाणी रविवारी रात्री धाड टाकली. या विवाह सोहळ्यात दोनशे जणांच्या उपस्थितीची मर्यादा महापालिकेने ठरवून दिली होती. त्याचबरोबर मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी ३०० ते ३५० पाहुणे असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही सर्रास भंग करण्यात आल्याचे आढळून आले. अनेकांनी मास्कही लावले नव्हते. याप्रकरणी महापालिकेने वधू-वराच्या आईवडिलांसह जिमखान्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर अंधेरी पश्चिम, वीरा इंडस्ट्रियल इस्टेट येथे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अमेथिस्ट या पबमध्ये रविवारी मध्यरात्री पालिकेच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी पबमध्ये कर्मचाऱ्यांनी मास्क लावले नव्हते. कर्मचाऱ्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्याचा अहवाल नव्हता. ५० टक्क्यांहून जास्त लोक पबमध्ये एकाच वेळी होते. सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात आले नसल्याने पालिकेने संबंधित पबच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावली. तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------