चेंबूर येथील वाशीनाका परिसरात वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने पाहायला मिळाली, तर रिक्षा आणि बसची संख्या कमी होती. बसमध्ये तुरळक प्रवासी होते. तसेच जे लोक घराबाहेर पडले होते ते मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळत होते. नेहमी गर्दी असलेल्या रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला. आरसी मार्ग, आरएन पार्क, म्हाडा कॉलनी आदी भागात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.
चेंबूर कॅम्प
चेंबूर कॅम्प परिसरात वीकेंड लॉकडाऊनला अनेक ठिकाणी रिक्षाच्या रांगा पाहायला मिळाल्या. लॉकडाऊन असल्याने अनेक रहिवाशांनी घराबाहेर पडणे टाळले. चेंबूर कॅम्पमध्ये एकाच इमारतीमध्ये २४ कोरोना रुग्ण आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वी भाजीपाला, कपडे आणि इतर वस्तूसाठी खूप गर्दी असायची. मात्र, आता लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने पाहायला मिळाली.
घाटला गाव
चेंबूर स्टेशनपासून जवळ असलेल्या घाटला गाव परिसरात नेहमीच गर्दी पाहायला मिळते, पण कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन आहे त्याला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील कामे वगळता सर्वांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे या भागात रस्ते रिकामे होते.