Join us

वीकेंड लॉकडाऊन...निर्जन रस्ते, शांतता....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

मुंबई: कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ...

मुंबई: कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा शांत झाल्याचे चित्र आहे. लालबाग, भायखळा हा मार्केटचा परिसर असो वा करीरोड-लोअरपरळ विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा गजबजाट असो या सर्व परिसरांत शनिवारी निर्जन शांतता दिसून आली. तर रस्ते दिवसभर मोकळे आणि निर्मनुष्य दिसून आल्याने स्थानिकांनी लाॅकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिलेला दिसून आला.

नेहमी वर्दळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. कामानिमित्त घराबाहेर रस्त्यांवर पडणाऱ्यांची पोलिसांकडून विचारणा होताना दिसून आली, तर दोन- तीन तासांच्या अंतराने पोलिसांची व्हॅन गस्त सुरू होती. शुक्रवारी रात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू झाला. या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

करीरोडच्या मोनो स्थानकाखाली बसणाऱ्या फेरी विक्रेत्यांनी पोलीसांनी हाकलून दिले. तर निवासी इमारतींखाली उभे राहणाऱ्या तरुणांनाही पोलिसांनी समज दिली. लॉकडाऊनमुळे लोकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केली. तर अनेकांनी पोलीस कारवाईच्‍या भीतीमुळे घरातच राहणे पसंत केले. या परिसरातील लालबागच्या मार्केट परिसरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही सुरू होती, तर रेस्टॉरंट- हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. वाहतुकीवरही परिणाम दिसून आला.

भायखळा पश्चिमेला सुंदरगल्ली वा स्थानक परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून दंड करण्यात आला. तसेच, भरदुपारी क्रिकेट खेळणाऱ्या पोरांच्या टोळक्यांनाही पोलिसांनी चांगलीच समज दिली. याखेरीज, भाय़खळा आणि करीरोड स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालकांनी टॅक्सींचे पार्किंग केले होते, आठवडाभराच्या तुलनेत शनिवारी या वाहनांमध्ये प्रवासीही कमी झाल्याचे दिसून आले.