वीकेंड लॉकडाऊन; मुंबई थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:08+5:302021-04-12T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रविवारचा वीकेंड लॉकडाऊन मुंबईकरांनी १०० टक्के यशस्वी केला. पहाटेपासून रात्र होईपर्यंत मुंबई शहरात सर्वच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रविवारचा वीकेंड लॉकडाऊन मुंबईकरांनी १०० टक्के यशस्वी केला. पहाटेपासून रात्र होईपर्यंत मुंबई शहरात सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवावगळल्या तर उर्वरित सर्व सेवा बंद होत्या. सकाळी १० वाजेपर्यंत काही ठिकाणी दुकाने खुली करण्यात आली होती. मात्र त्यांचे शटर अर्धेच उघडे होते. काही किराणामालाची दुकाने सुरू होती, मात्र हे प्रमाण कमी होते.
दक्षिण मुंबईत मस्जिद बंदर आणि डोंगरी परिसरात सकाळी १० पर्यंत किंचित गर्दी हाेती, लोक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. परंतु हे प्रमाण कमी होते. लालबाग, वरळी, लोअर परळ परिसरातही सकाळपासूनच शुकशुकाट होता. रस्त्यांवर वाहनांची आणि माणसांची गर्दी नव्हती. सार्वजनिक वाहतूक सेवावगळली तरी खासगी वाहतूकही बऱ्यापैकी कमी होती. अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी वाहने वगळली तर मुंबईच्या रस्त्यांवर फार काही वाहने धावत नव्हती.
माहीम, माटुंगा, सायन, कुर्ला, विलेपार्ले, सांताक्रुझ, घाटकोपर, साकीनाका, अंधेरी आणि बोरीवलीसह मालाड येथे सर्वच काही बंद होते. विशेषत: बाजारपेठा आणि दुकाने बंद असल्याने धावत्या मुंबईला ब्रेक लागला होता. कोरोनाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी, ब्रेक द चेनसाठी मुंबईकरांनी रविवारीदेखील वीकेंड लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी काही ठिकाणी, चौकात किंवा नाक्यांवर तरुणांची, कामगारांची गर्दी दिसत असली तरी हे प्रमाण कमी होते.
दादरसारख्या नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी मात्र सकाळी काही प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी हे प्रमाण ओसरले होते. मालाड येथे सकाळी हीच अवस्था होती. मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी येथील निरीक्षण नोंदविताना सांगितले की, सरकारने स्टेशनरी आणि झेरॉक्सची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली पाहिजे, कारण सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना झेरॉक्स किंवा स्टेशनरी लागत आहे.
-------------------
धारावीत बहुतांश दुकाने बंद
दादर मार्केट परिसरात सकाळी मोठी गर्दी होती. येथे नियमांचे उल्लंघन झाले होते. मात्र दुपारी येथील गर्दी विरली. पूर्व आणि पश्चिम परिसरातील रस्त्यांवरील किंचित गर्दी वगळली तर बऱ्यापैकी शुकशुकाट होता. दोन्ही बाजूंची दुकाने पूर्ण वेळ बंद होती. दुकानांमधील काही कारागीर दुकानांबाहेर ताटळकत होते. मात्र ही गर्दीदेखील नंतर कमी झाली. अत्यावश्यक सेवावगळता उर्वरित सेवा बंद होत्या. धारावी परिसरातही मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन पाळला गेला. धारावीमधील बहुतांश दुकाने बंद होती. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत होते. येथील रस्त्यांवर गर्दी नसली तरी बाहेर पडत असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक होते. दक्षिण मुंबईतील मनीष मार्केट बंद होते. मुळात येथील बाजारपेठ गेल्या काही दिवसांपासून निर्बंधांमुळे बंदच आहेत.
-------------------
- मुंबईत सर्वत्र वीकेंड लॉकडाऊन पाळला जात असतानाच दारूच्या दुकानांबाहेर मात्र तळीराम गर्दी करत असल्याचे चित्र होते.
- सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईतल्या बहुतांश बाजारपेठा, दुकाने बंद होती.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह उर्वरित रस्त्यांवर वाहनांसह माणसांची गर्दी कमी होती.
- सकाळी किंचित प्रमाणात होत असलेले व्यवहार दुपारी पूर्णपणे ठप्प झाले होते.
-------------------