मुंबई : राज्य शासनाकडून काही जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर, दुसरीकडे मात्र पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा राज्याच्या तुलनेत अधिक असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ ते २७ जुलैदरम्यान साताऱ्यातील पॉझिटिव्हिटी दर हा ८.०३ टक्के असल्याची नोंद आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात हा दर ६.८८ टक्के होता. पुणे जिल्ह्यात २१ ते २७ जुलैदरम्यान पॉझिटिव्हिटी दर हा ७.२३ टक्के होता, २० जुलैदरम्यान हा दर ६.४५ टक्के होता. कोल्हापूरमध्ये १४ ते २० जुलैदरम्यान पॉझिटिव्हिटी दर ६.९१ टक्के होता, तर २१ ते २७ जुलैदरम्यान हा दर ८.१९ टक्के असल्याचे दिसून आले.
सिंधुदुर्गमध्ये ६.४९ टक्के, सोलापूरमध्ये ५.९० टक्के, अहमदनगरमध्ये ४.९५ टक्के, बीडमध्ये ४.८८ टक्के, रायगडमध्ये ४.७० टक्के आणि रत्नागिरीत ३.८३ टक्के पॉझिटिव्हिटी दर असल्याची नोंद आहे. राज्यातील या जिल्ह्यांत अजूनही कोविडची दुसरी लाट ओसरली नसल्याने प्रशासनाकडून संसर्ग नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, कोविडसह साथीच्या आजारांचा धोका आहे. त्यामुळे साथीच्या आजारांसह कोविडविषयी यंत्रणांनी जागरुक राहिले पाहिजे, त्याकरिता योग्य त्या सेवासुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय चाचण्या आणि औषधोपचारांची सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे.