जलबोगद्यात ८० हजार किलो वजनाची झडप

By admin | Published: April 9, 2017 03:45 AM2017-04-09T03:45:07+5:302017-04-09T03:45:07+5:30

महापालिकेच्या ‘पाणीपुरवठा प्रकल्प’ खात्याद्वारे गुंदवली ते भांडूप संकुल या जलबोगद्यावर तब्बल ८० हजार किलो वजनाची व ९ हजार ६८० आटे असणारी मोठी झडप

Weighing 80 thousand kg in the watercourse | जलबोगद्यात ८० हजार किलो वजनाची झडप

जलबोगद्यात ८० हजार किलो वजनाची झडप

Next

मुंबई : महापालिकेच्या ‘पाणीपुरवठा प्रकल्प’ खात्याद्वारे गुंदवली ते भांडूप संकुल या जलबोगद्यावर तब्बल ८० हजार किलो वजनाची व ९ हजार ६८० आटे असणारी मोठी झडप कापूरबावडी येथे बसविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. १२.५० फूट व्यास असणारी ही झडप केवळ मुंबई महापालिकेच्या इतिहासात नव्हे, तर देशाच्या जलवितरण व्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच बसविण्यात येत आहे.
गुंदवली येथून भांडूप संकुल येथे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०१६मध्ये नवा जलबोगदा कार्यान्वित केला आहे. या जलबोगद्यामध्ये परिरक्षणाचे काम उद्भवल्यास १८ फूट व्यासाचा (५.५० मीटर) व १५.२० किलोमीटर लांबीचा हा जलबोगदा पूर्णपणे पाणी विरहित करणे आतापर्यंत आवश्यक होते. त्यामुळे गुंदवली येथून भांडूप संकुल येथे करावयाच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या ‘पाणीपुरवठा प्रकल्प’ या खात्याद्वारे या जलबोगद्यामध्ये कापूरबावडी येथे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या झडपेमुळे भविष्यात परिरक्षण उद्भवल्यास त्या दरम्यान जलबोगद्याचा निम्मा भाग सुरू ठेवणे व आधीच्या जलवाहिनीचा वापर करून पाणी वाहणे शक्य होणार आहे. त्यामुळे साहजिकच दैनंदिन जलवितरण व्यवस्था कमीत कमी परिणाम होऊन सुरळीत पद्धतीने सुरू ठेवणे शक्य होईल. (प्रतिनिधी)

८० हजार किलो वजनाची झडप बसविण्यासाठी १ लाख २० हजार किलो वजनाची क्रेन वापरण्यात येत आहे. या झडपेला ९ हजार ६८० आटे असून ही झडप उघडण्यासाठी ९ तास, तर बंद करण्यासाठी ९ तास एवढा वेळ लागणार आहे. महापालिकेच्या जलबोगद्यामध्ये पाण्याचा दाब हा साधारणपणे प्रत्येक चौरस सेंटीमीटरला १६ किलो एवढा असतो. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक चौरस सेंमीला २४ किलो एवढी क्षमता असणारी झडप जलबोगद्यात बसविण्यात आली आहे. या झडपेची एकूण किंमत ९ कोटी रुपये एवढी आहे.
- रमेश बांबळे, माहिती उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)

Web Title: Weighing 80 thousand kg in the watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.