Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

By महेश गलांडे | Published: November 11, 2020 07:47 PM2020-11-11T19:47:52+5:302020-11-11T19:49:10+5:30

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं

Welcome back dear friend, Kangana ranaut dance as soon as Arnab Goswami gets bail | Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

googlenewsNext
ठळक मुद्देअर्णब यांच्या अटकेनंतर कंगनाने महाराष्ट्र सरकावर टीका केली होती. तसेच, अर्णब यांच्यावर सूड भावनेतूनच ही कारवाई होत असल्याचं कंगनानं म्हटलं होतं.  

नवी दिल्ली: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. गोस्वामी यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच त्यांची तळोजा कारागृहातून सुटका केली. गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे. गोस्वामी यांनी दिलासा नाकारणं ही मुंबई उच्च न्यायालयाची चूक होती, असं महत्त्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केलं. अर्णब यांच्या सुटकेनंतर भाजपा नेत्यांसह समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, अभिनेत्री कंगना राणौतलाही अत्यानंद झालाय.  

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर गोस्वामींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज या प्रकरणी सकाळी साडे दहापासून सुनावणीस सुरुवात झाली. न्यायालयात ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी अर्णब यांची बाजू मांडली.

अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर ट्विटर ट्रेंड तयार झाला असून अनेकांनी ही इज बॅक असे म्हणत अर्णबच्या सुटकेचं समर्थन केलं. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही इज बॅक, जय हो... असे म्हटलं आहे. तर, कंगना राणौतनेही ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत अत्यानंद झाल्याचं म्हटलं आहे. अर्णब यांच्या सुटकेचा माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, असेही कंगनाने म्हटले आहे. दरम्यान, अर्णब यांच्या अटकेनंतर कंगनाने महाराष्ट्र सरकावर टीका केली होती. तसेच, अर्णब यांच्यावर सूड भावनेतूनच ही कारवाई होत असल्याचं कंगनानं म्हटलं होतं.  

कंगनाने शेअर केलेल्या व्हिडिओत आवो जी पधारो मारो देश.. हे गाणं वाजत असून कंगना या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. कंगनाने अर्णब यांच्या अटकेचा निषेध नोंदवला होता. तसेच, महाराष्ट्र सरकारवर या कारवाईनंतर टीकाही केली होती. 

नेमकं काय आहे प्रकरण?
२०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांची आत्महत्या
कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक (Anvay Naik) आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं. 

अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?
अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पोलीस तपासातून काय समोर आलं?
२०१८ मध्ये अन्वय आणि त्यांची आई कुमूद यांचे मृतदेह रायगडमधील काविर गावी आढळून आले. अन्वय यांचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर लटकलेल्या स्थितीत सापडला. तर कुमूद यांचा मृतदेह  तळमजल्यावर आढळला. अन्वय यांच्यावर डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्यांना कंत्राटदारांची देणी देणं कठीण जात होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी २०१८ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१९ मध्ये पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. यानंतर अन्वय यांच्या मुलीनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. देशमुख यांनी मे महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.

Web Title: Welcome back dear friend, Kangana ranaut dance as soon as Arnab Goswami gets bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.