फटाक्यांवरील बंदीचे स्वागतच, सर्वसामान्य मुंबईकरांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:37 AM2018-10-24T04:37:27+5:302018-10-24T04:37:37+5:30
फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार देतानाच फटाक्यांची आॅनलाइन विक्री केली जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट केले.
मुंबई : फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार देतानाच फटाक्यांची आॅनलाइन विक्री केली जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट केले. परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असे म्हणत रात्री ८ ते १० ही वेळदेखील फटाके फोडण्यासाठी ठरवून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशाचे जागृत संघटना, पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि व्यापारी वर्गाने स्वागत केले आहे. केवळ स्वागत नाही तर याचा सकारात्मक प्रभाव होईल आणि ध्वनी व वायुप्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोकण विभागाचे राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशिलकर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने कमी प्रदूषण करणारे पर्यावरणपूरक फटाके सणासुदीच्या काळात आठ ते दहा वाजेपर्यंत वाजवण्याची मुभा दिली आहे. मात्र मुळात फटाके हे पर्यावरणपूरक असूच शकत नाहीत. कारण फटाक्यांमुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण होत असते. फटाके जळत असताना हवेतला आॅक्सिजन घेत असतात. कुठलीही गोष्ट जळताना ती कार्बन डायआक्साइड बाहेर टाकत असते. त्यामुळे हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत असते. फटाके बनवण्यासाठीच्या कागदासाठी वृक्षतोड करावी लागते. फटाक्यामुळे आगी लागतात, अपघात होतात. फटाक्यांच्या कारखान्यात बालमजूर असतात. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या बालमजुरीला प्रोत्साहन दिले जाते. दिवाळीतील फटाक्यांची उलाढाल सुमारे चारशे कोटींची आहे. असे चारशे कोटी अनुत्पादित खर्च करणे देशाला परवडणारे नाही. फटाक्यांच्या वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शिवाय परिसंस्थेचे जीवनचक्रही बिघडविले जाते. दरम्यान, आता याबाबत जागृती होत आहे. पर्यावरणप्रेमी, विज्ञानप्रेमी, सामाजिक संस्था याविरोधात आवाज उठवत आहेत, असेही ते म्हणाले.
कौस्तुभ दरवेस यांनी सांगितले की, एक पर्यावरणप्रेमी म्हणून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. फटाक्यांची आॅनलाइन विक्री करण्याची परवानगी नाकारण्याचा निर्णय योग्यच आहे. फटाक्यांची आतषबाजी म्हणजेच दिवाळी हे एक समीकरणच झाले आहे. मोठमोठ्या फटाक्यांच्या माळा, बॉम्ब फोडणे म्हणजे अनेक सण-उत्सवांचे, आनंद व्यक्त करण्याचे, जल्लोष करण्याचा स्टेटस सिम्बॉलच झाला आहे.
रंगीत, आकर्षक आणि कमी धुराचे आणि प्रदूषणमुक्त फटाके
तयार केल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.
पण फटाके फोडल्यानंतर त्यात वापरल्या जात असलेल्या पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेतून विषारी धूर आणि कानठळ्या बसण्याइतका आवाज बाहेर पडतोच ना? काही वेळा रंगीबेरंगी किरणांनी आसमंत उजळून निघतो, पण तरीही धुरातून आसमंतात वायुप्रदूषण होते.
>...हे होतात दुष्परिणाम
आवाजाची पातळी ५५-६० च्या वर गेल्यास मनुष्याला त्रास होतो. सुतळी बॉम्बसारखे फटाके शंभर डेसिबलपेक्षा अधिक आवाज करतात.
ध्वनिप्रदूषणामुळे ताणतणाव, उच्च रक्तदाब, श्रवणदोष, निद्रानाश असे आजार होतात.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना आवाजामुळे समस्यांना सामोरे जावे लागते. फटाक्यांच्या आवाजामुळे पशुपक्ष्यांनाही त्रास होतो.
फटाके पेटविल्यानंतर कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनो आॅक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साइड, नायट्रोजन ट्रायआॅक्साइड, मॅग्नेशिअम डायआॅक्साइड, मॅग्नेशियम ट्रायआॅक्साइड, मॅग्नेशियम पेंटा आॅक्साइड, मॅग्नेशियम सल्फरसारख्या वायूंमुळे पर्यावरणाची हानी होते.े फटाके फोडणे बंदच केले पाहिजे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना फटाक्यांचा त्रास होत असतो. फटाक्यांच्या कारखान्यात बहुधा लहान मुलांना कामावर ठेवले जाते. त्यामुळे फटाक्याच्या दारूमुळे आरोग्यावर परिणाम होत असतो.
- मिली शेट्टी, पर्यावरणवादी
कमी आवाज आणि कमी धुराचे फटाके कसे निर्माण करता येतील, याबाबत सरकार फटाके बनविणाऱ्या कंपन्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र, अजूनही सरकार आणि कंपनीमध्ये चर्चाच सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय आला नाही.
- सचिन गायकवाड,
फटाके विक्रेता
चांगला निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये झाडांची संख्या खूप कमी होत आहे. त्यात हवेत धूलिकणांची संख्याही वाढत आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले तर हवेचे प्रदूषण वाढण्यास मदत होईल.
- झोरू बथेना, पर्यावरणवादी
>्रकमी प्रमाणात फटाके फोडल्याने आगीच्या घटना कमी होतील. फटाके फोडताना घरामध्ये श्वान असेल तर तो आवाजाने घाबरून जातो. पाळीव प्राण्यांच्या जवळ शक्यतो फटाके फोडू नयेत. ज्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या जास्त आहे तेथे फटाके फोडले नाही पाहिजेत. भिंतीवरील छिद्रांमध्ये पक्ष्यांची घरटी असतात. तसेच जमिनीतील बिळामध्ये सर्प राहतात, अशा ठिकाणी फटाके फोडता कामा नयेत. वन्यजीवांना कोणत्याही प्रकारची इजा न देता, दिवाळी साजरी केली पाहिजे. - सुनीश कुंजू, प्राणिमित्र