सतर्कतेने करा दिवाळीचे स्वागत, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 06:02 AM2020-11-03T06:02:36+5:302020-11-03T06:03:07+5:30
Iqbal Singh Chahal : मुंबईत १५ सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करू लागले.
मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला. मात्र माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने अखेर आपला प्रभाव दाखवून दिला. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.०६ वरून ०.४१ टक्के खाली आला आहे. तर सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत २९ टक्क्यांनी घट झाली आहे. तरीही सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियम पाळत दिवाळीचे स्वागत करावे, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबईत १५ सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करू लागले. महिनाभर सुरू असलेली ही मोहीम अखेर प्रभावी ठरली. परिणामी, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ६६ दिवसांवरून १७१ दिवसांवर पोहोचला आहे.
अशा काही उपाययोजना
- मुंबईतील ३५.२ लाख कुटुंबांपैकी ३४.२ लाख कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी पालिकेने केली.
- बेस्टच्या ३१०० बसगाड्यांवर व १७५० बसथांब्यांवर नो मास्क नो
एन्ट्री स्टिकर व घोषवाक्य.
- विनामास्क फिरणाऱ्या पाच लाख लोकांना दंड करण्याचे पालिकेचे लक्ष्य.
- मुंबईतील बहुतांश घरांमध्ये ४० लाख पत्रके, दुकानात व कार्यालयात २० लाख पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी यापुढेही असाच लढा सुरू ठेवा. दिवाळी सण सुरक्षित व सतर्कतेने साजरा करा.
- इकबाल सिंह चहल,
(मुंबई महापालिका आयुक्त)